निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

Vyaparimitra    15-Nov-2019
|

 
 
सध्याच्या काळात आयुष्यमानात वाढ झाली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य दुसर्‍रावर अवलंबून असता कामा नये. स्वत:ला आर्थिक प्राप्ती जरुरीपुरती असणे जरुरीचेे आहे. यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, कोेठे करावे, त्याचे फायदे काय याची माहिती येथे दिली आहे.
 
वाढलेल्या आयुर्मानाबाबत
 
वैद्यकीय विज्ञानाची कमाल आहे की, सर्वसामान्य भारतीयांचे आयुर्मान वाढत आहे. कधीकाळी एकसष्टी साजरी करणे हा फार मोठा कार्यक्रम असायचा व आज सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा देखील सामान्य मानला जातो. वयाची 85 ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. आपण आपल्या आयुष्याची तीन भागांमध्ये विभागणी केल्यास, पहिले 1/3 आयुष्य हे खरोखरच आनंददायी असते. कारण या काळात आपल्यावर काहीही जबाबदार्‍रा नसतात. आपले आई-वडील सर्व गरजा पुरवत असतात. पुढील 1/3 आयुष्य नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक जबाबदार्‍रा पार पाडण्यात जाते. हा उभरता काळ असल्यामुळे वेळ कसा निघून गेला समजत नाही. शेवटचे 1/3 आयुष्य कशाप्रकारे जगायचे आहे ते दुसर्‍रा कालखंडात ठरत असते. बर्‍राचशा इच्छा आकांक्षा आपण निवृत्तीनंतर पूर्ण करण्याच्या इराद्याने पुढे ढकललेल्या असतात. आधुनिक उपचार पद्धतीने आपले आयुर्मान वाढते आहे ही खरेतर आनंदाची बाब आहे, पण हे वाढलेले आयुर्मान आपल्या न कमावत्या काळातील असल्यामुळे बरेचदा दु:खदायक देखील आहे. पाश्‍चिमात्य देशांमधील सामाजिक सुरक्षा व्यवस्था निवृत्तीनंतरच्या आर्थिक, वैद्यकीय गरजांची काळजी घेत असते. हे खरे आहे की, त्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीयांपेक्षा जास्त आयकर भरावा लागतो. परंतु आपल्या देशात आयकर प्रामाणिकपणे भरून देखील अशी व्यवस्था दुर्दैवाने अजून तरी नाही. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंबव्यवस्था ही जबाबदारी उचलत असे.
 
गुंतवणूक नियोजनाबाबत गांभीर्य नाही
 
आज कुटुंबे छोटी छोटी होत असताना ही जबाबदारी स्वत:वरच येते. हे सर्व समजून उमजून देखील निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांंसाठी कराव्या लागणार्‍रा गुंतवणूक नियोेजनाबद्दल फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. खऱे तर निवृत्ती नियोजनाची सुरुवात नोकरी व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून करणे गरजेचे असते. परंतु निवृत्तीचा काळ अजून बराच दूर आहे, आत्ताच याबद्दल का काळजी करा असा विचार केला जातो. आपल्याला किती एक रक्कम निवृत्तीनंतर लागणार आहे याचा अंदाज नसल्यामुळे क्षुल्लक रकमेची बचत केली जाते वा चुकीच्या योेजनांमध्ये पैसेे गुंतवले जातात, जे वाढत्या महागाईचा सामना करू शकत नाहीत. हे सर्व तर ठीक आहे, झालेल्या चुका तर आपण दुरुस्त करू शकत नाही परंतु पुढे होणार्‍रा चुका मात्र टाळू शकतो व आपण त्याबद्दलच विचार करूया.
 
निवृत्तीनंतरचे मोठे प्रश्‍न
 
निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा प्रश्‍न असतो की, वेळ कसा घालवायचा व त्याचबरोबर उपलब्ध पैशामध्ये गरजा कशा भागवायच्या. या दोन्हीही प्रश्‍नांची उत्तरे एकाच उपायातून मिळाली तर किती बरे वाटेल नां? आज वयाच्या साठाव्या वर्षी देखील आपण तंदुरुस्त असतो व आपल्या अनुभवाची समाजाला देखील गरज असते. निवृत्तीनंतर अशी एखादी अर्धवेळ नोकरी वा व्यवसायाचा विचार करू शकतो ज्यामुळे वरील दोन्ही प्रश्‍न सुटू शकतात. आज सर्वत्र चर्चा असते की, बेरोजगारी वाढली आहे, परंतु काम करण्यासाठी योग्य व्यक्तीच मिळत नाहीत ही तक्रार देखील आहे. आपल्या अनुभवाचा फायदा जर एखाद्याला होत असेल तर त्यासारखे समाधान नाही. आपल्या पार्श्‍वभूमीप्रमाणे लेखा, व्यवस्थापन, शैक्षणिक वर्ग यामध्ये उपलब्ध संधींचा जरूर विचार करावा. आपण जोपासलेला एखादा छंद देखील मदतीस येवू शकतो. उदा. संगीत, चित्रकला, हस्तकला, खेळ, एखादी भाषा अवगत असणे; याचा आपण व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार करू शकता. उपजत छंदाला प्रशिक्षणाची जोड देवून आपल्या ज्ञानाची पातळी वाढवू शकता. राहती जागा प्रशस्त असल्यास एखादी आया ठेवून शिशुविहार सुरू करता येतो. खाद्य पदार्थ बनवण्याची आवड असणारे पार्सल/ टेक अवे सर्व्हिस सुरू करू शकतात. शक्यता बर्‍राच आहेत फक्त निश्‍चय व थोड्याशा तडजोडीची आवश्यकता असते. आपण जितके व्यस्त राहू तितके आपले आरोग्य चांगले राहून वैद्यकीय खर्च कमी होतो व उत्पन्नही मिळते, हे सूत्र लक्षात ठेवा.
 
तीन ठळक गरजा
 
मी एक गुंतवणूक सल्लागार म्हणून समोरील व्यक्तीला पैसा केव्हां व कशासाठी लागणार आहे हा प्रश्‍न विचारतो तेव्हां बहुतेक व्यक्तींचे उत्तर असते की, माहीत नाही किंवा अंदाज नाही. परंतु पैशाचे योग्य व्यवस्थापन करून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी थोडा गृहपाठ करणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर गुंतवणुकीच्या बाबतीत काही पथ्ये पाळणे देखील महत्वाचे आहे. निवृत्तीनंतर आपला पैसा तीन ठळक गरजा पुर्‍रा करण्यासाठी उपयोगात येणे आवश्यक आहे. 
1. निरंतर दरमहा उत्पन्नाचा स्त्रोत.
2. जमा रकमेचे वाढत्या महागाईपासून संरक्षण.
3. ठेवलेल्या पैशामध्ये वाजवी वाढ.
 
प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एकच एक समीकरण सर्वांसाठी लागू होत नाही. काही व्यक्तींना निवृत्तीवेतनाची सोय असते, काहींनी केलेल्या स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीतून नियमितरीत्या भाड्याच्या रूपाने उत्पन्न मिळत असते, तर काहींना निवृत्तीनंतरच्या गंगाजळीतूनच सर्व व्यवस्था करावयाची असते. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रत्येकाने नियमित लागणार्‍रा पैशाचा आढावा घ्यावा. या खर्चांमध्ये दररोजचे, दर महिन्याचे व वर्षातून एकदा होणारे या सर्व खर्चाची सविस्तर यादी बनवावी. यासाठी थोडा अवधी घेऊन मगच गुंतवणूक करावी. जोपर्यंत पेन व कागद घेऊन यादी बनवत नाही तोपर्यंत आपल्याला खरोखर लागणार्‍रा पैशाचा अंदाज येत नाही. या यादीची आपल्याला अत्यावश्यक, आवश्यक व अनावश्यक खर्चाचा अंदाज येण्यास देखील मदत होते. 
 
रकमेची गुंतवणूक
 
आपली काही एक रक्कम वरिष्ठ ठेव योजना, पोस्टल मासिक योजना किंवा म्युच्युअल फंडातील डेब्ट फंडस् तसेच मासिक उत्पन्न योजनांमध्ये ठेवणे आवश्यक आहे, जेथून दरमहा खर्चासाठी एक ठराविक रक्कम मिळते. वरिष्ठ ठेव व पोस्टल मासिक योजनांवर ठराविक व्याज मिळते व म्युच्युअल फंडातून दरमहा एस.डब्ल्यू.पी. द्वारे पैशाचा स्त्रोत निर्माण करता येतो. या योजनांमध्ये एकरकमी किती पैसे गुंतवायचे हे आपल्या दरमहा होणार्‍रा खर्चांवर अवलंबून असेल. उदा. दरमहा खर्च जर रु.20,000 असल्यास, 8% परतावा गृहीत धरून रु.25,00,000 गुंतविणे आवश्यक आहे. काही एक पैसे कायम हाताशी असणे आवश्यक असतात. ज्यामध्ये अंदाज नसणार्‍रा किंवा वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो अशी रक्कम आपल्या बचत खात्यात, म्युच्युअल फंडातील लिक्वीड योजना किंवा बँकांमध्ये कमी मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावेत. आपला वैद्यकीय विमा असल्यास फारच चांगली गोष्ट आहे. परंतु नसल्यास त्याचा जरूर विचार करावा. आज बर्‍राच कंपन्या वरिष्ठ व्यक्तींचा वैद्यकीय विमा उतरवताना असलेल्या व्याधी पहिल्या चार वर्षात दाव्यासाठी विचारात घेत नाहीत. परंतु त्यानंतरच्या काळात विद्यमान व भविष्यातील व्याधींवरील सर्व खर्च परस्पररीत्या भागवता येतोे.
 
म्युच्युअल फंड - गुंतवणूक
 
आपले काही एक खर्च असे असतात ज्यासाठी 2, 3, किंवा 5 वर्षांनंतर पैशाची आवश्यकता असते. यामध्ये देशांतर्गत व विदेशी प्रवास यांचा सहभाग असतो. यासाठी देखील थोडेसे नियोेजन करून म्युच्युअल फंडातील विविध योजनांचा आधार घेऊ शकता. आपल्या सर्वांना माहीत असेल की, म्युच्युअल फंडामध्ये लिक्विड फंड, डेब्ट फंड, हायब्रीड, बॅलन्स्ड व इक्विटी अशा विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. ज्यामध्ये कमीतकमी 2 दिवसांपासून काही एक वर्षांसाठी आपण पैसे गुंतवू शकतो. यातील बॅलन्स्ड व इक्विटी योजनांमध्ये शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक अधिक असते व त्याप्रमाणे जोखीम व परतावा देखील अधिक असतो. या योजनांमधील कमी कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये जोखीम जरूर असते, परंतु जसजसा गुंतवणुकीचा अवधी वाढत जातो त्या प्रमाणात जोखीम कमी होते. आपल्याला सर्वसाधारणपणे 3 ते 4 वर्षांनंतर लागणारा पैसा हायब्रीड वा बॅलन्स्ड योजनांमध्ये व 5 ते 6 वर्षानंतर हवा असलेला पैसा इक्विटी फंडामध्ये गुंतवण्यास हरकत नाही.
 
अनावश्यक जोखीम टाळा
 
लक्षात ठेवा आपले आर्थिक जोखीम घेण्याचे वय निघून गेले आहे. कृपया मोठा परतावा देणार्‍रा जाहिरातींपासून दूर रहा. जसजसा परतावा वाढत जातो तसतशी जोखीम देखील वाढते. एखाद्या योजनेतील पैसे कोठे गुंतविले जातात, त्या पैशाचा वापर कशासाठी व कोठे केला जातो याची सविस्तर माहिती घ्या. आपले मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांनी गुंतवणूक केलेली आहे म्हणून पटत नसताना देखील दबावाला बळी पडून आपणही त्यात गुंतवणूक करू नका. जरूर तेथे संकोच न करता विश्‍वासार्ह गुंतवणूक तज्ञाचा सल्ला जरूर घ्या. त्याची फी म्हणून थोडा खर्च येईल पण तो वाया न जाता अंतिमत: हितावहच ठरतो. अनावश्यक जोखीम घेण्यापेक्षा आपल्या गरजा कमी करणे, मर्यादित राखणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
(वृद्धत्व आनंदी कसे करावे - पुस्तकावरून साभार.) 
 
श्री. दत्ता प्रभाकर कणबर्गी, बी.कॉम