नवीन कंपनीचे नाव ठेवण्यासाठी नियम

|

 
 • खाजगी कंपनी असेल तर नावात खाजगी म्हणजे Private हा शब्द असायलाच हवा.
 • कोणत्याही कंपनीच्या नावात मर्यादित म्हणजे Limited हा शब्द असायलाच हवा.
 • ज्या नावाने एखादी कंपनी आधीच स्थापन झालेली आहे त्याच नावाची दुसरी कंपनी स्थापन करता येत नाही.
 • ज्या नावाने एखादी कंपनी आधीच स्थापन झालेली आहे त्या नावाशी साधर्म्य असलेली दुसरी कंपनी स्थापन करता येत नाही.
 • ज्या नावाने एखादी कंपनी आधीच स्थापन झालेली आहे त्या नावाचा उच्चार केल्यावर त्या उच्चाराशी साधर्म्य असलेल्या नावाची दुसरी कंपनी स्थापन करता येत नाही.
 • प्रस्तावित कंपनीच्या नावात आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योगसमूहाचे नाव वापरता येत नाही, म्हणजे मला आज कागद तयार करणारी एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर मला ‘टाटा पेपर्स लिमिटेड’ असे नाव घेता येणार नाही. असे नाव घेण्यासाठी टाटा समूहाची लेखी परवानगी आवश्यक आहे.
 • कंपनीने अंगीकृत केलेला व्यवसाय आणि कंपनीचे नाव यात विसंगती असता कामा नये. म्हणजे कंपनीच्या नावात केमिकल्स हा शब्द वापरायचा आणि प्रत्यक्ष व्यवसाय हा अभियांत्रिकी क्षेत्रातला निवडायचा असे नाव मंजूर होणार नाही.
 • कोणत्याही प्रकारे त्या कंपनीशी केंद्र अथवा राज्य सरकारचा काही संबंध आहे असे भासवणारे नाव घेता येणार नाही.
 • भारत सरकारने जे काही पुरस्कार देते त्या पुरस्कारांचे नाव कंपनीच्या नावात असता कामा नये. उदाहरणार्थ पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न वगैरे.
 • जी संविधानिक पदे आहेत त्यांचा वापरसुद्धा कंपनीच्या नावात होता कामा नये. उदाहरणार्थ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरे.
 • जी राष्ट्रीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या नावाचा वापर कंपनीच्या नावात होता कामा नये - उदाहरणार्थ महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरू वगैरे. म्हणजे ‘गांधी केमिकल्स’ असे नाव चालेल परंतु ‘महात्मा गांधी केमिकल्स’ हे नाव चालणार नाही.
 • कंपनीच्या नावात एखादा शब्द वापरल्यामुळे कोणत्याही समाजाची भावना दुखावेल असे नाव घेता येणार नाही.
 • दोन वर्षांच्या कालावधीत विसर्जित झालेल्या कंपनीचे नाव निवडता येणार नाही.
 • प्रस्तावित कंपनीचे नाव हे सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावात थोडी फेरफार करून तयार केलेले असेल तर असे नाव मंजूर होत नाही. उदाहरणार्थ ‘मुंबई केमिकल्स लिमिटेड’ अशा नावाची कंपनी असताना ‘न्यू मुंबई केमिकल्स’ या नावास मंजूरी मिळणार नाही.
 • प्रस्तावित कंपनीचे नाव हे प्रस्थापित कंपनीच्या नावाच्या लघुरूपाची नक्कल करणारे असेल तर ते नाव मंजूर होणार नाही. उदाहरणार्थ : HMT, BHEL, ONGC, GAIL, TELCO, TISCO वगैरे.
 • कंपनीच्या नावातून त्या कंपनीच्या कायदेशीर स्वरूपाबाबत गैरसमज निर्माण होणार असेल तर ते नाव मंजूर होत नाही. उदाहरणार्थ : कंपनीच्या नावात ‘सहकारी’ असा शब्द वापरता येणार नाही.
 • प्रस्तावित कंपनीचे नावच अपूर्ण असेल तर ते नाव मंजूर होणार नाही. उदाहरणार्थ : केमिकल्स लिमिटेड किंवा इंजिनिअरिंग लिमिटेड.
 • इंग्रजीत नाव असलेल्या नावाचे फक्त भाषांतर करून नवीन नाव तयार केल्यास असे नाव मंजूर होत नाही.
 • फक्त कंसामध्ये लिहिलेल्या शब्दात बदल करून नवीन नाव तयार केल्यास अशा नावास मंजूरी मिळत नाही. उदाहरणार्थ : शरद प्रेस लिमिटेड आणि शरद प्रेस (इंडिया) लिमिटेड.
 • कंपनीचे नाव म्हणून निवडलेल्या शब्दाला काहीच अर्थ नसेल तर अशा नावाबद्दल रजिस्ट्रारला अधिक माहिती मागण्याचा अधिकार आहे.
 • या व्यतिरिक्त कंपनी रजिस्ट्रारला एखादे नाव जर आक्षेपार्ह वाटले तर त्याला ते नाव नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.
 • याविषयी अधिक माहितीसाठी कंपनी कायद्याखेरीज General Clauses Act चा सुद्धा अभ्यास करावा.
श्री. प्रमोदकुमार लड्डा