ज्येष्ठ नागरिकांना आयकर कायद्यांतर्गत सवलती

Vyaparimitra    06-Sep-2019
|


1. वरिष्ठ नागरिकाची व्याख्या
संबंधित आर्थिक वर्षात ज्यांचे वय 60 वर्षे किंवा जास्त आहे असे नागरिक; ज्येष्ठ नागरिक होत आणि ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते अतिज्येष्ठ नागरिक होत.
 
2. ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांना मिळणारी कर सवलतीची कमाल मर्यादा
ज्या ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांचे एकंदर वार्षिक उत्पन्न (आर्थिक वर्ष 2019-20 पासून) अनुक्रमे 3 लाख व 5 लाख रु. आहे त्यांना आयकर भरावा लागणार नाही. सर्वसामान्य करदात्यांसाठी ही मर्यादा रु. 2.50 लाख आहे.
 
3. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकराचे दर पुढीलप्रमाणे
 
एकंदर उत्पन्न करदर - ज्येष्ठ नागरिकांसाठी
 
 
 60 ते 80 आणि
पेक्षा कमी
80 वर्षे
त्यापेक्षा जास्त 
रु. 3 लाखापर्यंत  0%  0%
रु 3 लाख ते 5 लाख  5%    0%  
 रु. 5 लाख ते 10 लाख 20%   20%
 रु. 10 लाखापेक्षा जास्त 30%  30% 
 
4. आरोग्य विमा हप्ता कर वजावटीची कमाल मर्यादा
आर्थिक वर्ष 2019-20 पासून ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विम्याचा हप्ता भरला असेल तर त्यांना याबाबतची रु. 50,000 पर्यंतची वजावट कलम 80डी अंतर्गत मिळू शकते. तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:च्या आरोग्योपचारावर रु. 50,000 पर्यंत खर्च केला असेल त्यांनाही अशी वजावट मिळते. तथापि, आरोग्योपचारा-वरील खर्च व आरोग्य विम्याचा हप्ता यापैकी एक सवलत संमत आहे. (दोन्हीची वजावट एकत्रित घेता येणार नाही) तसेच अशा दोन्हींचा खर्च संबंधितांनी रोख स्वरूपात न करता इतर मार्गांनी (चेक, डेबिट/क्रेडिट अशा मार्गांनी) केलेला असला पाहिजे.
 
5. बँक किंवा पोस्ट ऑफिस यामधील बचत व मुदत ठेवीवरील व्याज कर वजावटीची मर्यादा
सर्वसामान्य करदात्यासाठी कलम 80टीटीए अंतर्गत बचत खाते व ठेवींवर मिळणार्‍या व्याज वजावटीची मर्यादा रु. 10,000 आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी मर्यादा कलम 80टीटीबी अंतर्गत रु. 50,000 आर्थिक वर्ष 2019-20 पासून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बँक, पोस्ट ऑफिसमधील बचत खाती व मुदत ठेवींवरील व्याजाचा समावेश आहे. असे सर्व व्याज रु. 50,000 पेक्षा कमी असेल तर त्यावर आयकर आकारला जाणार नाही.
 
6. निर्दिष्ट रोग किंवा आजारांच्या उपचारांवर खर्च केल्यास त्याबाबतच्या कर वजावटीची मर्यादा
सर्वसामान्य करदात्यांनी निर्दिष्ट रोग किंवा आजार यांच्या उपचारावर केलेल्या (स्वत:साठी किंवा अवलंबून असलेल्या नातेवाईकांसाठी) खर्चाची मर्यादा रु. 40,000 कलम 80डीडीबी अंतर्गत संमत आहे. तथापि, सर्वसामान्य करदात्यांनी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्दिष्ट आजाराच्या उपचारार्थ खर्च केल्यास तो 2019-20 पासून कलम 80डीडीबी अंतर्गत रु. 1 लाख पर्यंतच्या वजावटीस पात्र होईल.
 
7. अग्रिम कर भरणा करण्याबाबतची सवलत
ज्या करदात्यांची एका आर्थिक वर्षातील करदेयता रु. 10,000 किंवा जास्त आहे त्यांनी अग्रिम करभरणा करणे अनिवार्य आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांना कोणताही अग्रिम कर भरणे अनिवार्य नाही, तथापि, त्यांचे उत्पन्न “धंदा किंवा व्यवसाय यापासून नफा किंवा फायदा” या शीर्षकांतर्गत मिळत नसावे.
 
8. प्रमाणित वजावटीचा लाभ
वेतन लाभार्थी करदात्यांना आर्थिक वर्ष 2019-20 पासून कलम 16 अंतर्गत रु. 40,000 पर्यंतची प्रमाणित वजावट संमत करण्यात आलेली आहे. पेन्शन घेणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनाही रु. 40,000 प्रमाणित वजावट घेता येईल.
 
9. (इलेक्ट्रॉनिक पद्धतीऐवजी) कागदी स्वरूपात आयकरपत्रक दाखल करणे
सहज (आयटीआर-1) किंवा सुगम (आयटीआर-4) या नमुन्यात पत्रक दाखल करणार्‍या व ज्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रु. आहे अशा ज्येष्ठ करदात्याला कागदी स्वरूपात पत्रक दाखल करता येईल. त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पत्रक भरणे अनिवार्य नाही. तथापि, ई-फायलिंगचा पर्याय ते स्वेच्छेने घेऊ शकतात.
 
10. टीडीएस करकपात होऊ नये म्हणून फॉर्म 15एच
ज्येष्ठ करदात्यांची संबंधित वर्षातील करदेयता शून्य असेल, तर स्त्रोतातून करकपात होऊ नये म्हणून
फॉर्म 15एच देण्याची सुविधा उपलब्ध.
 
11. रिव्हर्स मॉर्गेज ॠणअंतर्गत घेतलेल्या रकमेवर कॅपिटल गेन्स कर आकारणी नाही
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या स्थावर मिळकतीवर घेतलेल्या रिव्हर्स मॉर्गेज ॠण रकमेवर कोणताही कर कॅपिटल गेन्स अंतर्गत किंवा इतर शीर्षकांतर्गत भरणे आवश्यक नाही.
 
12. व्यवसायकर माफी
व्यवसायकर कायद्याच्या कलम 27ए (एफ) प्रमाणे ज्यांच्या वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा व्यक्तींना व्यवसायकर कायद्याखाली कराची माफी आहे. म्हणजेच ज्या वर्षात 65 वे वय चालू आहे त्या वर्षाचा व्यवसायकर भरावा लागतो. त्याच्या पुढील वर्षापासून व्यवसायकर भरावा लागत नाही.