दैनंदिन आहारात आवश्यक “कोलिन”

Vyaparimitra    22-Jan-2020
|

colin_1  H x W:
 
 
“कोलिन” नावाचा एक रासायनिक घटक आहारात आवश्यक असतो. मात्र त्याची माहिती फारशी मिळत नाही. या लेखात त्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
 
जेवण म्हणजे फक्त “उदरभरण नोहे” तर “जाणिजे यज्ञकर्म” असं समर्थांनी म्हटलं आहे. याचा अर्थ आपण आपला आहार शास्त्रशुद्ध पद्धतीने घ्यायला पाहिजे. आपण आपल्या आहारात प्रथिने, कर्बोदके, मेदाम्ले, खनिज द्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि मुख्य म्हणजे जीवनसत्त्वे घेतली पाहिजेत, असं जाणकार म्हणतात. आपल्याला पुरेशा उष्मांकात म्हणजे कॅलरीमध्ये न्याहारी-जेवण घेणं क्रमप्राप्त आहे. आता आहारात
 
“अँटी ऑक्सिडंट” वर्गीय पदार्थ असावेत, म्हणून आहार-तज्ज्ञ सुचवतात. शरीरात “फ्री रॅडिकल” वर्गीय अपायकारक रसायने तयार होतात. त्यांचा यथायोग्य निचरा करण्यासाठी विविध प्रकारची “अँटी ऑक्सिडंट” रसायने उपयुक्त पडतात. उदाहरणार्थ टोमॅटोमधील “लायकोपेन” हा घटक एक चांगल्यापैकी “अँटी ऑक्सिडंट” घटक आहे. हा घटक पपई, कलिंगड हिरवी-पिवळी-लाल ढब्बू मिरचीमध्ये देखील आहे. लायकोपेन हा एक महत्त्वपूर्ण घटक असूनही त्याचा समावेश एक जीवनसत्त्व म्हणून झालेला नाही. असाच एक घटक सध्या जाणकारांच्या चर्चेत आहे. त्याचं नाव आहे “कोलिन” (उहेश्रळपश). कोलिनमुळे रक्तातील कोलेस्टेरॉॅलचे प्रमाण सामान्य राहण्यासाठी मदत होते. लहान मुलांच्या मेंदूची आणि मज्जारज्जूची वाढ चांगली होते. वृद्धांमध्ये आढळणारा अल्झायमरचा त्रास या घटकांमुळे होणार असेल तर तो लांबतो. यकृताचे कार्य उत्तम चालावे म्हणून कोलिन हा घटक फार उपयुक्त पडतो. कोलिन हा जीवनसत्त्वाइतका महत्त्वाचा घटक असून तो फार प्रसिद्ध नाही. व्हिटॅमिनच्या व्याख्येमध्ये तो तंतोतंत बसत नाही. पण म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही. प्रतिदिन पुरुषांना 550 आणि महिलांना 450 मिलिग्रॅम कोलिनची आवश्यकता असते. गर्भवती महिलांना तर याहून थोडे जास्त कोलिन मिळणं आवश्यक आहे. वाढीच्या वयातील सर्वांना पुरेसे कोलिन मिळणं गरजेचं आहे. पण ते पुरेसे मिळत नाही, असं जागतिक आकडेवारीवरून दिसून येतं.
 
कोलिन म्हणजे काय?
 
कोलिन रसायन काही खाद्यपदार्थांपासून नव्याने शोधून काढलंय असं नाही. अ‍ॅडॉल्फ स्ट्रेकर यांना बैल आणि डुक्कर यांच्या पित्ताशयातून काढलेल्या रसात हा घटक सापडला. पित्तरसाला ग्रीक भाषेत “कोले” म्हणतात. प्रो स्ट्रेकर यांनी म्हणून त्या रसायनाला 1862 मध्ये कोलिन नाव दिले. हा पदार्थ प्रयोगशाळेत ऑस्कर लिब्राईश यांनी प्रयोगशाळेत बनवला आणि त्याचे रासायनिक गुणधर्म तपासले. शरीराला त्याची गरज कुठे असते ते कळले. अमेरिकेत “फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड” ने कोलिनला व्हिटॅमिनचा दर्जा दिला नाही, पण आहारातील एक “अत्यावश्यक घटक” म्हणून दर्जा दिला. त्याचं कारण महिला त्यांच्या शरीरात एस्ट्रोजेन हॉर्मोनचा उपयोग करून कोलिन तयार करू शकतात. पुरुषांच्या शरीरात मात्र कोलिन तयार होणं कठीणच! जे काही बनतं ते फार कमी बनतं. याचा अर्थ सर्वांनाच आहारातून पुरेसे कोलिन मिळवणं जरूरीचं आहे. गर्भवती महिलांना आहारातून होणारा कोलिनचा पुरवठा कमी होत असतो. कारण गर्भाच्या मेंदूची वाढ होत असते आणि त्यावेळी कोलिनची गरज जास्त असते. बालकाचा जन्म झाल्यानंतरदेखील त्याला काही वर्षे कोलिन नियमित पुरेसे मिळणे गरजेचे असते. स्वीडनमधील बालकांच्या शाळेत एक संशोधन करण्यात आले होते. ज्या मुलांच्या शरीरात कोलिन योग्य पातळीवर होते, त्यांची अभ्यासातील प्रगती लक्षणीय होती. त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. कोलिनचे कार्य इतके मर्यादित नाही. शरीरातील प्रत्येक पेशीला एक आवरण (मेम्ब्रेन) असतं. त्याची जडण-घडण उत्तम होण्यासाठी कोलिनसारखे रेणू उपयुक्त ठरतात. यामुळे विविध पेशींचे एकमेकांशी असलेलं संतुलन योग्य पद्धतीने होते. साहजिकच मेंदूशी संबंधित आीण परस्परांशी संबंधित नानाविध प्रकारच्या संदेशांची देवाण-घेवाण उत्तम प्रकारे होत राहाते. यकृतामधील मेदाम्ले विविध इंद्रियांकडे पोचवण्याच्या महत्वाच्या कार्यातही कोलिनचा सहभाग असतो.
 
होमोसिस्टीन नावाचा एक घटक अपायकारक असून तो आपल्या रक्तात आढळून येतो. तो रक्तवाहिन्यांमधून वाहत असताना वाहिन्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला इजा करू शकतो. तेथे मेदाम्ले साचू शकतात. यामुळे रक्त वाहण्याच्या क्रियेमध्ये अडथळा होतो. हृदयविकार होण्याची ही चिन्हे असतात. नायसिन (व्हिटॅमिन बी3) किंवा फॉलिक आम्लसारख्या व्हिटॅमिनवर्गीय रसायनांसह कोलिन रक्तवाहिन्यांमधील साचलेल्या मेदाम्लाचा निचरा करण्यासाठी मदत करते.
 
प्राणीमात्रांमध्ये असेटाईल-कोलिन नावाचे एक रसायन रक्तामधून शरीरात पसरत (वाहात) असतं. त्याचं कार्य म्हणजे मज्जातंतूपासून स्नायूपर्यंत आणि तेथून परत मज्जातंतूपर्यंत संदेशाची देवाण-घेवाण करायची. यामुळे असेटाईल कोलिनला “न्यूरो-ट्रान्समीटर” वर्गीय रसायन म्हणतात. हा रेणू “शिकणे” आणि “स्मृती” (लक्षात ठेवणे) या दोन महत्त्वाच्या क्रियांमध्ये भाग घेतो. हा घटक 1915 साली इंग्लंडच्या लॉवि डेल यांनी शोधून काढला. न्यूरो-ट्रान्समीटर म्हणून जर्मनीच्या हेनरी ऑटो यांनी त्याचे संशोधन केले. जैवशास्त्रज्ञांनी शोधून काढलेला हा पहिलाच न्यूरोट्रान्समीटर असल्याने फार महत्त्वपूर्ण होता. हे लक्षात घेऊन डेल आणि ऑटो यांना 1936 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
 
कोलिन कशातून मिळते?
 
कोलिनची करामत लक्षात घेतली तर हा अतिशय उपयुक्त घटक आपल्या आहारात असलाच पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. मांसाहारी व्यक्तींना हा घटक मासे आणि मटण यामधून मिळू शकतो. शाकाहारी मंडळींना मात्र त्यासाठी विविध खाद्यपदार्थांमधून कोलिन मिळवावे लागते. कारण शाकाहारी पदार्थांमध्ये त्याचे प्रमाण काहीसे कमी असते. तथापि काही पदार्थांमध्ये कोलिन आहे. उदाहरणार्थ कोबी, कॉलिफ्लॉवर, हिरवा मटार, डबल-बी, ब्रोकोली, पालक, मश्रुम, भूईमुगाच्या शेंगा, मका, दूध, दही, बदाम, काजू वगैरे. याखेरीज प्रत्येक अंड्यामध्ये 100 ते110 मिलिग्रॅम कोलिन असते. मासे, कोळंबी यामध्येही कोलिन असते. थोडक्यात म्हणजे कोलिनला कोणी व्हिटॅमिन मानो अथवा न मानो, आपण उदरभरण करताना आहारातून कोलिनयुक्त खाद्यपदार्थ निदान यज्ञकर्म म्हणून तरी सेवन करावेत. यामुळे तब्येत उत्तम राहायला मदत होईल.
 
 
डॉ. अनिल लचके,
पुणे
020-2565 2902