आपली प्रतिकारशक्ती वाढवणारा फलाहार

Vyaparimitra    22-Jan-2020
|

फलाहार_1  H x W
 
 
आपली प्रतिकारशक्ती बळकट असेल तर आपली एकंदरीत तब्येत चांगली रहाते. ॠतु बदलला की एखाद्याला सर्दी-खोकला-पडसे असे श्‍वसन-संस्थेचे विकार होतात. कुणाच्या त्वचेवर चट्टे उमटात. खाण्यात काही वेगळा पदार्थ आला की काहींना अ‍ॅलर्जी आल्यासारखं वाटतं. छोट्या-मोठ्या जखमा लवकर भरून निघतात. आजूबाजूला भरपूर जिवाणू-विषाणू असतात त्यामुळे संसर्गजन्य रोग झालाच तर तो लवकर बरा व्हायला मदत होते. जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची सर्वसामान्य प्रतिकारशक्ती उत्तम असणं आवश्यक ठरतं. त्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच आपल्या सवयी आदर्श असणं गरजेचं आहे. धुम्रपान, तंबाखूचं सेवन, वेळी-अवेळी खाणं टाळणं, त्याचप्रमाणे व्यायाम-विश्रांती-झोप असं सारं काही आपण योग्य प्रमाणात घेऊ शकतो. दिलखुलास स्वभाव देखील प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त असतो. लसीकरणाने देखील अनेक रोग आपण टाळू शकतो. प्रतिकारशक्तीसाठी प्लिहा, प्रतिजन (अँटीबॉडीज) रक्तातील पांढर्‍या पेशी अन्य काही पेशींच्या सहाय्याने हानिकार जीवाणू, विषाणू किंवा बाह्य हल्ल्याला कारणीभूत झालेल्या घटकांचा बंदोबस्त करतात.
 
काही निवडक खाद्यपदार्थ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. ते खूप महाग असतात असं नाही. मात्र ते जाणीवपूर्वक आहारात असावेत, असं जाणकार म्हणतात. आपण अशा काही खाद्यपदार्थांचा विचार करूयात !
 
संत्र-मोसंबी आणि लिंबू
  
एकेकाळी जेव्हा कुणी संत्री-मोसंबी विकत घेणारा ग्राहक दिसला की लोक समजायचे की त्याच्या घरी कुणीतरी आजारी पडलाय! या फळांना इंग्रजीत “सायट्रस फ्रुट्स” म्हणतात. त्यात जीवनसत्त्व क (व्हिटॅमीन सी) चे प्रमाण चांगले असते. एका मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये दिवसभर पुरेल एवढे व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम हे खनिज असते. रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आहारात हलकी-फुलकी फळं किंवा त्यांचा रस उपयोगी पडतो यात शंका नाही. आपल्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी तर असतातच पण इतर प्रकारच्या विशिष्ट कार्य करणार्‍या पेशी देखील असतात. पांढर्‍या रक्तपेशी जीवाणू-विषाणूंच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढवतात. पांढर्‍या पेशींची वाढ चांगली व्हावी म्हणून व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. व्हिटॅमिन सी भरपूर असणारे लिंबू आपल्या घरी नेहमी असतं. त्याचा उपयोग स्वयंपाकात होतो आणि सरबत करायलाही होतो. लिंबाचा स्वाद उत्तम असतोच आणि ते आरोग्यदायी असते.
 
ढब्बू मिरची
 
आपल्याकडे हिरव्या रंगाच्या ढब्बू मिरच्या वर्षभर मिळत असतात त्याला सिमला मिरची असंही म्हणतात. त्यातही लाल आणि पिवळ्या रंगाच्या ढब्बू मिरच्या सर्रास मिळत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने त्याचं मोठं महत्त्व आहे. कारण प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणार्‍या इतर घटकांसह व्हिटॅमिन सी प्रमाण त्यामध्ये भरपूर आहे. विशेषत: लाल रंगाच्या ढब्बू मिरचीत सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. लाल आणि पिवळ्या (ढब्बू) मिरचीचा उपयोग खास करून सॅलडमध्ये केला जातो.
 
पालक
 
पालेभाज्यांमधील पालक ही एक लोकप्रिय भाजी आहे. आपले आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आवश्यक असणारी बीटा-कॅरोटीनवर्गीय रसायने पालकात असतात. माणसाच्या शरीरात “फ्री रॅडिकल” म्हणून ओळखली जाणारी अनेक अपायकारक रसायने सतत तयार होतात असतात. त्यांना विष्प्रभ करण्यासाठी “अँटीऑक्सिडंट” नामक रसायने उपयुक्त असतात. ती रसायने आणि व्हिटॅमिन सी पालकमध्ये भरपूर आहे. पालकामध्ये लोह खनिज असल्याने रक्ताची वाढ होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे विविध पेशींचं कार्य उत्तम होत असते. पालकामधील विविध घटक विषाणुमुळे होणार्‍या व्याधी (उदाहरणार्थ फ्ल्यू) दूर ठेवण्यासाठी योग्य आहेत.
 
ब्रॉकोली
 
कॉलीफ्लॉवरची आठवण करून देणारी एक भाजी म्हणजे ब्रॉकोली. मुख्यत: परदेशामध्ये मिळणारी ही भाजी आता आपल्याकडे सर्रास मिळू लागली आहे. ब्रॉकोलीमध्ये बहुतेक सर्व म्हणजे व्हिटॅमिन ए, सी आणि ई आदि व्हिटॅमिन असतात. यात प्रतिकारशक्तीला “उभारी” आणणारी अँटी-ऑक्सिडंट वर्गीय रसायने मोठ्या प्रमाणात आहेत. तथापि, ब्रॉकोली जास्त शिजवू नये. कारण ती सहज लवकर शिजते. शिवाय त्यातील सर्व उपयुक्त घटक टिकून राहतात. परदेशात काही लोक ब्रॉकोली कमी शिजवितात, प्रसंगी सॅलडमध्ये समाविष्ट करून कच्ची खातात.
 
दही (योगर्ट)
 
प्रतिकारशक्ती टिकून राहावी किंवा वाढावी म्हणून दही उपयुक्त पडते. दह्यामध्ये असणारे विविध प्रकारचे जीवाणू अत्यंत उपयुक्त असतात. त्यांना “फ्रेंडली बॅक्टेरिया” म्हणतात. काही जीवाणू जीवनसत्त्वे तयार करीत असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि डी चा उल्लेख करायला पाहिजे. दह्यातील जीवाणूंमुळे एकूणच तब्येत चांगली राहते.
 
लसूण आणि आले
 
आपल्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये लसूण वापरलेला असतो. यामुळे त्या पदार्थांची चव चांगली लागते. शिवाय लसुणाच्या समावेशामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि बी असे अनेक पोषक पदार्थ आपल्याला मिळतात. लसूणामध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी अनेक रसायने आहेत. लसूण बुरशीरोधक आहे. पोट साफ करणारी काही रसायने लसूणात आहेत. परिणामी अनेक अपायकारक पदार्थांचे उत्सर्जन सुलभपणे होते. साहजिकच आपली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. लसुणाप्रमाणे आपल्या मसालेदार पदार्थात आले समाविष्ट केले जाते. आल्यामध्ये जिंजेरॉल हा रासायनिक घटक असतो, तो महत्त्वाचा आहे. शरीरातील अपायकारक जीवाणूंचा नाश करण्याची क्षमता आल्यामध्ये आहे. यामुळे अर्थातच आपली प्रतिकारशक्ती वाढते.
 
हळद
 
आपल्या दैनंदिन आहारातील काही पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे खाद्य-पदार्थाला चांगला रंग आणि स्वाद येतोच. गुणकारी हळदीला पिवळा जर्द रंग प्राप्त करून देणारा पदार्थ म्हणजे “करक्युमिन” असून तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. हळदीमधील हे रसाजन विषाणूरोधक (अँटिव्हायरल) आणि काही प्रमाणात वेदनाशामक आहे. हळदीमधील करक्युमिन-प्रमाणे इतरही काही घटक आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
 
बदाम
 
बदामात प्रतिकारशक्ती वाढविणारा एक मुख्य घटक म्हणजे व्हिटॅमिन ई आहे. प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन सी विशेष महत्त्वपूर्ण आहे. अपायकारक “फ्री रॅडिकल” वर्गीय रसायनांचा नि:पात करण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि सी उपयुक्त आहेत. बदामामध्ये ओमेगा-3 हा स्निग्ध पदार्थ असतो. त्याचाही उपयोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. बदाम जरी महाग असले तरी त्यातील बरेच घटक उत्तम आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.
 
आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या “लशीं”ची जशी मदत होते तशी मदत आहारातील काही खाद्यपदार्थांची मदत होते. त्यांचा समावेश आहारात जरूर करायला पाहिजे.
 
 
डॉ. अनिल लचके,
पुणे.
98220 25108