जाणून घेऊया सर्वकाही टीसीएस बद्दल...!!!

|

tcs_1 H x W: 0
 
भारतीय आयकर कायद्यामध्ये ‘टीसीएस’ नावाचा एक महत्त्वाचा विषय आढळून येतो. खरे तर बहुतांश करदात्यांनी ‘टीडीएस’ हे नाव ऐकलेले आहे किंवा त्याबद्दल त्यांना माहितीसुद्धा आहे परंतु ‘टीसीएस’ म्हटल्यावर एक प्रख्यात आयटी सेक्टरची कंपनी एवढेच बहुतांश लोकांच्या डोक्यात येते. परंतु आयकर कायद्यांतर्गत ‘टीसीएस’ म्हणजे काय? हा नेमका काय प्रकार आहे? हा कोणाला लागू आहे? त्याबद्दलचे दर किती आहेत?
 
त्याचे रिटर्न कसे भरावेत? अशी सर्व सविस्तर माहिती या लेखात आपण पाहूया. बहुतांश करदात्यांना, व्यापार्‍यांना आणि लोकांना ‘टीडीएस’ ची माहिती असते; परंतु ‘टीसीएस’ म्हणजे काय हे माहित नसल्यामुळे किंबहुना ‘टीसीएस’ हे नाव कधी ऐकलेही नसल्यामुळे केलेला हा लेखन प्रपंच...
 
1. ‘टीसीएस’ म्हणजे नेमके काय?
 
खूपच मुलभूत आणि जरूरीचा असा हा प्रश्‍न. ’टीसीएस’ ची सविस्तर माहिती पाहण्याआधी ‘टीसीएस’ म्हणजे नेमके काय आहे पाहणे खूपच महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण पाहूया ‘टीसीएस’चे पूर्ण नाव टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स.
 
अगदी सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर जसे नावामध्ये म्हटले आहे, टॅक्स अर्थातच कर हा कलेक्ट केला जातो, म्हणजेच गोळा केला जातो; त्यालाच ‘टीसीएस’ असे संबोधले जाते. आता हा कर नेमका कोणी गोळा करावा? किती टक्केवारीने गोळा करावा? कुठल्या व्यवहारांवर गोळा करावा? त्यासंबंधित टीसीएसचे रिटर्न कोणी, कधी आणि कसे भरावे? अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे आपण पाहूया :
 
टीडीएस आणि टीसीएस या दोघांमध्ये अगदी मुलभूत फरक सांगायचा झाला तर टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स म्हणजेच कर हा ठराविक पेमेंट करताना कापला जातो. याउलट टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स म्हणजेच कर हा ठराविक व्यवहाराच्या वेळी अतिरिक्त ‘गोळा’ केला जातो. असा हा कर विक्रेत्याद्वारा जेव्हा विक्री होते त्या ठिकाणी लगेचच गोळा केला जातो आणि म्हणूनच त्याला टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स असे म्हटले जाते.
 
2. ‘टीसीएस’ करावयाची प्रक्रिया आणि संबंधित कलम
 
आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार ठराविक करदात्यांना विशिष्ट टक्केवारी एवढा कर त्यांच्या खरेदीदाराकडून नमूद केलेल्या विशिष्ट व्यवहारांवर टीसीएस स्वरूपात गोळा करावा लागतो. टीसीएस ज्या व्यवहारांवर लागू होतो असे बहुतांश व्यवहार हे व्यापार आणि व्यवसायाशी असे निगडित आहेत. हेच मुख्य कारण असावे, ज्यामुळे सर्वसामान्य जनता आणि करदाते जसे पगारदार व्यक्ती इत्यादी यांना टीसीएस हा प्रकार नेमका माहिती नसतो.
 
वर नमूद केल्याप्रमाणे ठराविक विक्रेता करदात्याला, आपल्या विक्रीच्या वेळी, समोरील खरेदीदाराकडून ठराविक टक्केवारीमध्ये कर वसूल करून तो सरकारखाती टीसीएसच्या रूपात भरावा लागतो. थोडक्यात म्हणजे विक्रेता हा खरेदीदार यांच्यावतीने कर गोळा करून सरकारखाती जमा करतो आणि त्यानंतर खरेदीदार त्याचा उपयोग किंवा क्रेडिट आपले आयकर विवरणपत्र दाखल करताना घेऊ शकतो.
 
आयकर कायद्याच्या कलम 206सी मध्ये कुठल्या वस्तूंवर किंवा व्यवहारांवर विक्रेत्याने किती टक्केवारीने खरेदीदाराकडून कर वसूल करावा अशा सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
 
3. टीसीएस खाली येणार्‍या वस्तू किंवा व्यवहार आणि त्यांचे टक्केवारीचे करदर

 

 
हा खर्‍या अर्थाने सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे कारण ह्या प्रश्‍नाच्या उत्तरामध्ये आपण पाहणार आहोत की, ‘टीसीएस’ नेमके कोणत्या वस्तूवर आणि व्यवहारावर लागू होतो आणि त्या व्यवहाराच्या किती टक्के कर विक्रेत्याला गोळा करावा लागतो. याचे सहज आणि सोपे आकलन खालील दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला सहजरित्या होईल. येथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणे जरूरीचे आहे ती म्हणजे खाली नमूद केलेल्या वस्तूंचा वापर जर उत्पादन किंवा प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने केला असेल तर तेव्हा कर देय होणार नाही. थोडक्यात खालील वस्तू जर व्यापाराच्या उद्देशाने वापरल्या गेल्या असतील तर त्यावर खाली दिलेल्या तक्त्यानुसार कर भरावा लागेल. असा हा कर विक्रेत्या, समोरील खरेदीदाराकडून विक्रीच्या वेळीच गोळा करेल.
 

अ.क्र.

वस्तूंचा प्रकार/व्यवहाराचे वर्णन

दर (%)

1

मनुष्याच्या सेवनासाठी / मानवी वापरासाठी तयार केलेली लिकर (अल्कोहोलिक मद्य

)

(भारतीय निर्मित विदेशी लिकर व्यतिरिक्त)

1
2

टिंबर लाकूड (फॉरेस्ट लिजच्या अंतर्गत)

2.5

3

तेंदू पाने

5

4

टिंबर लाकूड (फॉरेस्ट लिज सोडून इतर कोठल्याही मार्गे)

2.5

5

जंगली (फॉरेस्ट) उत्पादक वस्तू/उत्पादने (तेंदूची पाने आणि टिंबर वगळता)

2.5

6

स्क्रॅप

1

7

खनिजे (जसे लिग्नाइट, कोळसा, लोह धातूसारखी खनिजे)

1

8

रुपये दहा लाखापेक्षा जास्त मूल्याची मोटार वाहन खरेदी केल्यास

1

9

पार्किंग लॉट, टोल प्लाझा आणि खाण व उत्खनन

2

 
टीप : व्यावहारिकदृष्ट्या पाहता, सर्वसाधारण जनतेला आणि करदात्याला वरीलपैकी अनुक्रमांक 8 आणि 9 हे नक्कीच कामी येऊ शकतात.
 
4. टीसीएसच्या तरतुदीसाठी विक्रेत्यांचे केलेले ठराविक वर्गीकरण
 
टीसीएसच्या रूपात कर कोण गोळा करू शकते, अशा विक्रेत्यांचे काही विशिष्ट करदाते किंवा संस्थांमध्ये वर्गीकरण केले आहे. खाली दिलेल्या यादीशिवाय अन्य कुठल्याही विक्रेत्याला टीसीएसचे रूपात वेगळा कर गोळा करण्याची जरूरत किंवा अनुमती नाही.
 
(1) केंद्र सरकार (2) राज्य सरकार (3) स्थानिक प्राधिकरण (4) वैधानिक महामंडळ किंवा प्राधिकरण
(5) कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपन्या (6) भागीदारी संस्था (7) सहकारी संस्था (8) विशिष्ट आर्थिक वर्षासाठी आयकर कायद्यांतर्गत खात्यांचे लेखापरीक्षण (टॅक्स ऑडिट) केले गेलेली कोणतीही व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यू.एफ.)
 
5. टीसीएसचे सरकारखाती जमा (पेमेंट) कधी करावे आणि त्यासंबंधी पत्रके (रिटर्न) कधी भरावीत
 
सरकारखाती टीसीएस भरणा तसेच त्यासंबंधी टीसीएसचे पत्रक (रिटर्न) भरण्याच्या देय तारखा खालील तक्त्यावरून सहज लक्षात येतील :
 

टीसीएस गोळा केलेला महिना

गोळा केलेला टीसीएस सरकारखाती
भरणा करावयाची देय तारीख

त्रैमासिक टीसीएस पत्रके

त्रैमासिक टीसीएस पत्रके

भरावयाची देय तारीख

एप्रिल

मे

जून

7 मे

7 जून

7 जुलै

 

1 एप्रिल ते 30 जून

 

 

15 जुलै

 

जुलै

ऑगस्ट

सप्टेंबर

7 ऑगस्ट

7 सप्टेंबर

7 ऑक्टोबर

 

1 जुलै ते 30 सप्टेंबर

 

15 ऑक्टोबर

ऑक्टोबर

नोव्हेंबर

डिसेंबर

7 नोव्हेंबर

7 डिसेंबर

7 जानेवारी

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर

15 जानेवारी

जानेवारी

फेब्रुवारी

मार्च

7 फेब्रुवारी

7 मार्च

7 एप्रिल

1 जानेवारी ते 31 मार्च

15 मे

 
थोडक्यात ज्या महिन्यात टीसीएसच्या रूपात कर गोळा केला आहे तो महिना संपल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत चलन क्रमांक 281 मध्ये टीसीएसचा भरणा सरकारखाती करावा. टीसीएस रूपात कर गोळा करणार्‍या जबाबदार विक्रेत्या करदात्याने जर संबंधित व्यवहारांवर करच गोळा केला नाही किंवा गोळा केलेला कर वर दिलेल्या तक्त्यानुसार देय तारखेपर्यंत सरकारखाती जमा केला नाही तर अशा विक्रेत्याला 1% प्रतिमहा किंवा महिन्याचा भाग एवढे व्याज आकारले जाईल.
 
कर संकलित म्हणजेच कर गोळा करणार्‍या प्रत्येक विक्रेत्या करदात्याला आपले टीसीएसचे त्रैमासिक टीसीएस रिटर्न फॉर्म 27इक्यू मध्ये दाखल करणे अनिवार्य आहे. वरील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे टीसीएस कर गोळा न केल्यामुळे किंवा गोळा केलेला टीसीएस कर उशिरा भरल्यामुळे येणारे व्याज हे संबंधितही त्रैमासिक रिटर्न (फॉर्म क्रमांक 27इक्यू) आधीच सरकारखाती भरणे जरूरी आहे.
 
6. टीसीएस संबंधित प्रमाणपत्र / सर्टिफिकेट
 
जेव्हा एखादा कर वसूल करणारा विक्रेता, त्याचे तिमाही टीसीएस रिटर्न वर म्हटल्याप्रमाणे फॉर्म 27इक्यू मध्ये दाखल करतो. तेव्हा त्याने ज्या खरेदीदाराकडून टीसीएस गोळा केला आहे त्या खरेदीदारास टीसीएसचे प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे.
 
फॉर्म क्रमांक 27डी या नमुन्यात टीसीएसचे पत्रक फाईल केल्यानंतर त्यासंबंधित प्रमाणपत्र अर्थात सर्टिफिकेट दिले जाते. अशा या फॉर्म क्र. 27डी प्रमाणपत्रामध्ये अर्थात सर्टिफिकेटमध्ये मुख्यत: विक्रेता आणि खरेदीदार या दोघांचेही नाव, या दोघांचाही पॅन नंबर, विक्रेता म्हणजेच ज्याने टीसीएस कर गोळा केला आहे आणि ज्याने आपले टीसीएसचे तिमाही रिटर्न फाईल केले आहे अशा विक्रेत्याचा टॅन नंबर, विक्रेत्याने एकूण गोळा केलेल्या कराची रक्कम, कर गोळा केल्याची तारीख, कराचा लागू दर इत्यादी तपशील असतो.
 
असे हे टीसीएसचे प्रमाणपत्र / सर्टिफिकेट तिमाही पत्रक भरल्यापासून पंधरा दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. म्हणजेच फॉर्म 27डी मध्ये टीसीएसचे प्रमाणपत्र/सर्टिफिकेट अदा करण्याच्या देय तारखा आपल्याला पुढील तक्त्यावरून सहज लक्षात येईल :
 

तिमाही / त्रैमासिक कालावधी

फॉर्म 27डी अदा करण्याची देय तारीख

30 जून रोजी संपणार्‍या तिमाहीसाठी

30 जुलै

30 सप्टेंबर रोजी संपणार्‍या तिमाहीसाठी

30 ऑक्टोबर

31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीसाठी

30 जानेवारी

31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीसाठी

30 मे

 
समारोप :

 

 
बहुतांश करदात्यांना, लोकांना टीडीएस जरी माहीत असले तरी असे आढळून आले आहे की, टीसीएस हा प्रकार अजून तरी त्यांनी एवढा ऐकलेला नाही. खरे पाहता आयकर कायद्यातील हा सुद्धा एक महत्त्वाचा असा विषय आहे. कारण, व्यावहारिक उदाहरण घ्यायचे झाले तर तुम्ही दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मोटर गाडी जर खरेदी करत असाल, तर आपले पॅन नंबर म्हणजेच फॉर्म क्रमांक 26एएस जरूर तपासून पहावे. कारण त्या खरेदी किंमतीवर गाडी विकलेल्या विक्रेत्याने 1% टीसीएस नक्कीच तुमच्याकडून गोळा केला असेल आणि ह्या गोळा केलेल्या टीसीएसच्या रकमेचे क्रेडिट म्हणजेच उपभोग तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र भरताना आवर्जुन घ्यावे. तसेच संबंधित मोठ्या विक्रेत्यांसाठी सुद्धा टीसीएस ही गोष्ट जाणणे फार जरूरीचे आहे; कारण की जर तुम्ही टीसीएस गोळा करण्यासाठी जबाबदार व्यक्तीमध्ये येत असाल, तर तुम्हाला वर म्हटल्याप्रमाणे टीसीएसचे पेमेंट, टीसीएसचे रिटर्न, त्याचप्रमाणे टीसीएसची प्रमाणपत्रे/सर्टिफिकेट वेळेवरच देणे फार जरूरीचे आहे अन्यथा आपणास लेट-फी आणि / किंवा दंड तसेच व्याजरूपी नुकसान होईल एवढे नक्की. आपण सर्वांनी आपले करविषयक काम वेळेवरच पूर्ण करावे हीच मनोकामना आणि सदिच्छा...!!!
सीए. अनिरुद्ध सुरेश राठी,
पुणे 94235 75556